Tuesday, January 21, 2014

श्रीराधा-माधव


आराध्यो भगवान व्रजेश तनयस्तद्धाम वृन्दावनम
रम्या काचीदुपासना व्रजवधुवर्गेण या कल्पिता

राधा कृष्ण उपासना ही मधुरातिमधुर अप्राकृत, दिव्य रागमयी युगुलोपासना आहे. श्रीराधा-कृष्ण मीलनावर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी श्रीराधा-भावाचा अंगीकार श्रीकृष्ण-सुखार्थ करून या उज्ज्वल रसाचा परमोत्कर्ष दाखविला (राधिकार भावे पभुर सदा अभिमान, चैतन्य चरितावली).

संत मीराबाईंनी - "मैने सपनोमे परनी गोपाल" असे म्हणून पायात घुंगरू बांधून, कन्हैय्यापुढे नाच नाचून ही प्रेमोपासना केली.

महाराष्ट्रातील थोर संत विभूति श्री गुलाबराव महाराज हे स्वतःस ज्ञानेश्वर कन्या आणि श्रीकृष्ण पत्नी समजत असत. "कात्यायनी महामाये महायोगीन्यधीश्वरी, नन्द्गोपसुतं देवी पतिं मे कुरुते स्वाहा" या गोपींनी जपलेल्या महामंत्राचे अनुष्ठान त्यांनी आजन्म 'पंचतालिका' या भाव देहाने कात्यायनी व्रत अंगीकारून कांता-भक्ती केली.

वृंदावनातील गुल्म, लता, औषधी बनावे अशी परम भागवत श्री उद्धवाची प्रार्थना आहे. (वृन्दावने किमपि गुल्म लतौषधीनाम - असे श्रीमदभागवतात म्हंटले आहे). व्रजात विशेषतः गोकुळात किडा मकौडा बनण्याचे सौभाग्य प्राप्त व्हावे, ही देवश्रेष्ठ घोषणा आहे. श्री शुकदेवांनी वृंदावन लीलेसाठी पोपटाची योनी पत्करली.

ज्ञानेश्वर माऊलीं म्हणतात, 'एरवी शुकादिक दाटुले, विषयी जिणोनि बैसले, तेही विषय वर्णिता बनले, भाट जयाचे'. तर गोपींचा गौरव करताना, 'कबीर क्या कहे, जा जमुनाके तीर, एकेक गोपीके प्रेम मे (नखोमे), बह गये कोटी कबीर'. असा दोहा कबीरांनी उच्चारला. स्वतः ब्रह्मानंदाने परिपूर्ण असणारी साक्षात ब्रह्मविद्या श्रीकृष्णरति साठी लालायीत आहे. 'ब्रह्मानन्देन पूर्णाहं तेनानन्देन त्रुप्तधि, तथापि शून्यमात्मामन्ये कृष्ण रति विना' असे पद्मपुराणात म्हंटले आहे. सारांश शामसुंदराची रामलीला आस्वाद करावयाचा तर श्री राधिकेची परम कृपा हवी.

वृन्दे वृन्दावनानंदा राधिका परमेश्वरीं,
गोपिकां परमां श्रेष्ठाम ल्हादिनी शक्ती रूपिणीम.


रसतत्व
महाभाव स्वरुप श्रीराधा ही भगवंताची सर्व श्रेष्ठ 'ल्हादिनी' शक्ती आहे, 'संधिनी' शक्ती नित्य वृंदावन बनली आहे, तर 'चिति' शक्ती (योगमाया) रासलीलाचे आयोजन करते. सुमूर्त ल्हादिनी शक्तीद्वारा आलिंगीत श्रीकृष्ण आनंदाचे आस्वादन आणि वितरणही करतात. या दिव्य, चिन्मय, आनंदाच्या अभिव्यक्तीलाच 'रसै वै सः' म्हणतात. प्रामुख्याने हे रस पांच प्रकारचे आहेत.


शांतरस
हा निष्ठामय आहे, यात सदैव अखंड समाधान आहे (हेच देवाचे दर्शन, सदा राहो समाधान - संत जनाबाई) ईश्वर आपल्या हृदयात आहे, त्याच्या सत्तेने सर्व चालते अशी येथे भूमिका आहे, 'देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका', अशी येथील शिकवण आहे, 'सर्व कर्मांचा आत्मकर्ता, हे विश्वासे सर्वात दृढ मानी' असे याचे वर्णन नाथांनी केले आहे. येथे प्रभू अव्यक्त आहे.





दास्यरस
हा निष्ठामय सेवामय आहे, येथे देव व्यक्त आहेत, स्वामीची सेवकावर सेवकाची स्वामीवर सदैव प्रेमदृष्टी आहे, सेवकास पाहून स्वामीस परम संतोष होतो, येथे मर्यादा क्रम आहे, भगवंता विषयी गौरवबुद्धी आहे. श्री हनुमानजी हे दास्य भक्तीचे आदर्श आहेत


सख्यरस
हा निष्ठामय, सेवामय संकोच-राहित्यमय आहे. येथे देव आणि भक्त यांची समान रति आहे, यात ऐश्वर्य संपन्न आणि विशुद्ध माधुर्यमय रति - असे दोन स्तर पडतात. अर्जुन आणि उद्धव हे ऐश्वर्य आणि ज्ञान युक्त सखे आहेत, व्रजातील बाल गोपाळ हे विशुद्ध भक्तिमय सखे आहेत, हे देवाच्या खांद्यावर चढतात, लोणी चोरतात, देवावर रुसतात. भागवत धर्मात, वारकरी संप्रदायात बाळक्रीडा म्हणण्याची परिपाठी आहे. याचे एक महत्वाचे रसाचे दृष्टीने कारण म्हणजे देवास आपल्या बालपणीच्या खोड्या ऐकून खदाखदा हसू येते, देव परम आल्हादित होतात, देवाचे सुख, दास्य-रसापेक्षा येथे वाढते. देवाने गोकुळीच्या लोकांना ब्रह्मज्ञान अर्पण केले. 'लोका गोकुळीच्या, झाले ब्रह्मज्ञान, केलीया वाचून, जप तप, जप तपे काय, करावा साधन, जब नारायणे, कृपा केली', असा कृपेचा महिमा आहे.


वात्सल्य रस
हा निष्ठामय, सेवामय, संकोच-राहित्यमय ममतामय आहे. दास्य आणि सखा या दोन्ही रति पेक्षा येथे देवाची पुत्ररूपाने अधिक काळजी वाहिली आहे. सखा भावापेक्षा येथे वत्सलता हा गुण देवाचे अधिक सुख वाढवितो. मी आठवा अवतार धारण करून दुष्ट संहार करीन तुम्हास बन्दियुक्त करीन असे स्वप्नात येवून आधीच सांगितल्यामुळे आणि पुत्र असूनही ऐश्वर्य ज्ञान कायम राहिल्यामुळे वासुदेव आणि देवकी देवांच्या बालपणीच्या लीलांना आन्चवले आणि नंद यशोदा हे विशुद्ध माधुर्यमय वात्सल्य रसाचे अधिकारी झाले. आपली सर्व गाऱ्हाणी गोपी यशोदेकडे आणीत असत.


माधुर्य रस
हा रसांचा राजा आहे. निष्ठा, सेवा, विश्रम्भ ममता आणि आत्म समर्पण आहे. चढत्या चढत्या श्रेणीने देवाचा संतोष सर्व रसापेक्षा माधुर्य रसातच अधिक आहे. 'क्षणभरी याच्या, सुखाचा सोहळा, पहा एक वेळा, भोगोनिया. याचे सुख कळलियावरी, मग दारोदारी फिराल', असा येथे दंडीमा आहे. येथे श्रीकृष्ण प्रियकर आणि राधा प्रेयसी आहे. यात द्वारिका-लीला, मथुरा-लीला आणि वृंदावन-लीला अशी पूर्ण, पुर्णतर पुर्णतम मधुर लीला चालते. येथे लक्ष्मीगण अंश विभूति, महिषीगण (राण्या), वैभव विलास व्रज सुन्दरीगण काव्यव्युहरुपा आहेत.  


श्रीकृष्ण स्वरूप
कृष्ण नाम, कृष्ण गुण, कृष्ण लीला वृंद:
कृष्ण स्वरूप सम सब चिदानंद


श्रीकृष्ण नाम
भगवंताची दोन स्वरूपे आहेत. एक विग्रह स्वरूप आणि एक नाम स्वरूप. नाम आणि नामी अभिन्न आहेत. भगवंताच्या आनंद स्वरूपालाच 'श्रीकृष्ण' (म्हणजेच नाम) असे म्हणतात. एकनाथी भागवतात म्हंटले आहे:

ऐसा परमानंद म्हणसी कोण, तो मी अज अव्यय श्रीकृष्ण,
आनंद स्वरूप तो मी ची जाण, मज वेगळे स्थान असेना,
त्या स्वानंद नाम श्रीकृष्ण, ते तुझे स्वरूप उद्धव जाण,
तेथ नाही मी तू पण, परम कारण उर्वरित.

अशी श्रीकृष्ण भावना नाथांनी सांगितली आहे. नामाने ध्यानात सचेतन भागवद-अविर्भाव होतो. 'नाम घेता रुपी प्रगट पै झाला' असे नाम सामर्थ्य आहे. 'तुझ्या नामाचा महिमा तुज कळे पुरुषोत्तमा' असे नामाचे महिमान आहे (रामाला त्याच्या नामाचा महिमा कळल्याची घटना ठावूक आहेच ना). 'जे कृष्णचि होइजे आपण, ते कृष्ण होय आपुले अंत:करण' असा अनुभव संत सांगतात, श्रीगुरुंनी दिलेल्या जागृत नामाने भाव देहाची प्राप्ती होवून श्रीकृष्ण-सुखैक तात्पर्यमयि सेवा सुरु झाली कि नामाची कृपा झाली असे समजावे.


श्रीकृष्ण लीला
प्रभू गुणदर्शना नंतर श्रीराधा-कृष्ण रुपाची स्फूर्ती होवू लागते. अप्राकृत लीला प्रत्यक्ष दिसू लागतात, चिन्मय वृंदावन धाम उदित होते. परिकराशिवाय लीला उदित होत नाही, दामा-सुदामा-श्रीराधा-गोपिजन यांची स्फूर्ती होते.

सद्भावाचे निजभजन करी, हृदयी प्रगटती श्रीहरी,
तव देहाची विघ्ने बाहेरी, क्षणामाझारी पालटती. (एकनाथी भागवत-५९०३)

चित्त चैतन्य होता भेटी, हर्षे बाष्प दाटे कंठी,
पुलकांकित रोमांच उठी, उन्मीलित दृष्ट पुंजाळे (श्रीमद्भागवत - ५९२)

करिता अच्युत चिंतन, सप्रेम गहिवरे मन,
अटटाहासे करी रुदन, अनिवार स्फुंदन उर्ध्वश्वासे  (श्रीमद्भागवत - ५९३)

त्या रुदना सवेचि हर्ष प्रगटे, त्या हर्षाचेनी नेते पाटे,
हासी लागे कडकडाटे, सूखोद्भटे गद्गदोनि (श्रीमद्भागवत - ५९४)

जेवो माऊली देखोनि डोळा, बालक नाचे नाना कळा,
तेवी गुरु वाक्यात सोहळा, देखोनि स्वळीला निजभक्त नाचे (श्रीमद्भागवत - ५९९)

तेणे नीज नृत्य विनोदे, फावलेनि निजबोधे,
नानापरीचे भागवदपदे, सुखानुवादे स्वये गातु (श्रीमद्भागवत - ६००)

एवं सप्रेम भक्ती संभ्रमु, तेणे निरसे साधन श्रमू,
फिटे नि:शेष भावभ्रमु, वाचासी उपरमु इंद्रिया होय (श्रीमद्भागवत - ६०५)

वर भागवतात उल्लेखलेली सर्व स्थूल, सुक्ष्म, पर अनुभवाची लक्षणे सुरु होवून शिष्य परमानंदात बुडी देतो. हे सर्व गुरुकृपेने होते. नाम, धाम, गुण, लीला, सर्व चिदानन्द्घनच आहेत.





श्रीकृष्ण स्वरूप
कृष्णस्तु भगवान स्वयं (श्रीमद्भागवत - //२८) असे शास्त्रप्रमाण असूनकेवलानुभवानन्द स्वरूप: परमेशवर:’ असे भक्त प्रल्हादांनी श्रीकृष्ण स्वरूप सांगितले आहे. येथे परब्रह्म द्विभुज नराकृति आहे. 'ईश्वर: परम: कृष्ण: सच्चिदानंद विग्रह:' असे देवाचे स्वरूप आहे, मधुरा भक्तीत तें रासेश्वर आहेत.  


श्रीकृष्ण सेवा
सेवा साधक रूपेण, सिद्धरूपेण चात्रहि,
तदभाव लीप्सुना कार्या व्रजलोका नुसारत:

सेवा साधक रूपेण - सजातीय वासना विशिष्ट सत्संग मिळाला कि साधक श्री युगुल सरकारच्या दर्शनासाठी तळमळू लागतो तो खालील पैकी एक किंवा अनेक सेवा करू लागतो, यालाच सेवा साधक रूपेण असे म्हणतात.
०१) श्रीविग्रह सेवा,
०२) श्रीगुरुसेवा
०३) श्रीमद भाग्वद सेवा
०४) गोसेवा
०५) श्री तुलसी सेवा
०६) श्रीनाम संकीर्तन सेवा
०७) मंत्रसेवा
०८) व्रजधूली सेवा
०९) श्री वृंदावन धाम सेवा
१०) श्री निकुंज सेवा
११) साधुसेवा
१२) वंदनसेवा
१३) स्थावर जंगम आलिंगन सेवा

 
सेवा सिद्ध रूपेण - जे स्वसुख वासना गंधलेश शून्य आहेत, श्रीकृष्णाचे भक्त आहेत, श्रीकृष्णाशिवाय ज्यांना कोणतेही प्रयोजन नाही, श्रीकृष्ण ज्यांचे अनन्य साधन आहेत, श्रीकृष्ण रस तत्वज्ञ असून ज्यांनी श्रीकृष्ण मंत्राचा आश्रय घेतला आहे, सद्धर्म शासक असून श्री राधा-कृष्ण तत्व जाणणाऱ्या संप्रदायात आहेत, अशा श्रीकृष्ण दर्शन प्राप्त रसिकाकडून साधक वृंदावन दीक्षा घेतो त्यावेळेस कृपाशक्तीद्वारा - शक्तिपात योगाने अंत:श्चिन्तित देह श्रीगुरू त्याला प्रदान करून गोपीवृंद करतात. या उपासनेला 'श्रीकृष्णभक्त-प्रसादजा' म्हणतात. हिच्या योगे उपासकात श्रीगुरू आदेशानुसार भाव जागृत होतात:
०१) संबंध भाव
०२) वय भाव
०३) नाम भाव (प्रिय, कला, लता, सखी)
०४) रूप भाव
०५) वेश भाव
०६) आज्ञा भाव
०७) वास भाव
०८) सेवा भाव
०९) पराकाष्ट श्वास भाव
१०) पाल्य दासी भाव

ही रस सामुग्री घेवून चिन्मय भाव देहाने जी श्रीकृष्ण सुखैक सेवा सुरु राहते त्याससेवा सिद्ध रूपेण’ असे म्हणतात.

वैष्णव साधना क्षेत्रात सच्चिदानंद मूर्तीस मंजिरी असे नाव आहे. सिद्ध देहात मंजिरीची स्फूर्ती तद्रूपता प्राप्त होते, साधक देहाने साधन होते, सिद्ध देहाने रस संवेदन, लीला आस्वादन विग्रह होतो. भाव देहात विरह प्राप्त होतो, प्रेम देहात मिलन तत्व आहे, सिद्ध देहात अखंड लीला स्वादन आहे,

श्रीराधेच्या अष्ट सख्या आहेत. सखी, नित्यसखि, प्राणसखी, प्रियासखी, परम श्रेष्ट सखी असे त्याचे पाच विभाग आहेत. श्रीललीता, श्रीविशाखा, श्रीचित्रा, श्रीइंदुलेखा, श्रीचंपकलता, श्रीरंगदेवी, श्रीतुंगदेवी, श्रीसुदेवी अशी त्यांची नावे असून त्या ताम्बुलसेवा, कर्पूर, वस्त्रालंकार परिधान, नृत्य, चामर डुलविणे, गीतावाद्य, जलसेवा, पुष्पशैय्या, वेलबुट्ट्या काढणे, सांकेतिक भाषांचे ज्ञान, ज्योतिष ज्ञान, वनस्पती ज्ञान, द्यूत शास्त्र, गांधर्व विद्या, वेणी रचना, शकुन शास्त्र, अशा विविध सेवेने राधेला सुखी करतात.


 मधुरा भक्ती
) वेणु (नाद) माधुरी: वंशीध्वनी अखंडानंद प्रदान करण्यासाठी मुरलीधराचे अनिवार्य निमंत्रण आहे. जडाला चेतन आणि चेतनाला जड बनविण्याची सर्वकर्षीणी शक्ती वेणु नादात आहे. गायी बोलविण्याच्या इच्छेने श्रीकृष्ण मुरली वाजवितात त्यावेळी केवळ गायीच वेणुध्वनी ऐकतात. श्रवण किंवा अश्रवण याला केवळ श्रीकृष्ण इच्छाच कारण आहे. ‘राधा-राधा’ असा ध्वनी मुरलीतून निघतो. मुरलीद्वारा संकेत होताच - गोपिकांना प्रेम समाधी लाभ होतो.

ऐकून माझे वेणूगीत, गोपिका सांडूनी समस्त, निजदेहाते सांभाळीत, मज गिवसित पातल्या. (भा. १०९)
पुत्रस्नेह सांडूनी धाये, विधीते रगडोनी पाये, माझे आवडीचेनि लवलाहे, गोपिका मज पाहे पावल्या (भा. ११०)
त्याच परी जाण गायी, वेणु-ध्वनी वेधल्या पाही, व्याघ्र भय विसरल्या देही, माझ्या ठायी विनटल्या (भा. १११)
सांडूनी पती पित्याची चाड, धरोनी वेदशास्त्रांची भीड, माझे ठायी नीजभाव दृढ, प्रेम अतिगोड गोपिका (भा. ११२)
माझ्या वेणु-ध्वनी वेधले मन, वत्से विसरली स्तनपान, मुखीचा कवळ मुखी जाण, माझे ध्यान लागले (भा. ११३)
माझ्या वेणु श्रवणास्तव जिही, नीजवैर सांडुनी देही, येरयेरावरी माना पाही, व्याघ्र हरणे तीही विनटली (भा. ११४)
म्या उपडिले यमलार्जुन, ते तरले ते नवल कोण, वृन्दावनीचे वृक्ष तृण, माझ्या सानिध्ये जाण उद्धरले (भा. ११५)


) लीला (क्रीडा) माधुरी: क्रीडा माधुरी आस्वादन करावयाची तर लीला धारी, लीला परिकर, लीला स्थल, लीला प्रयोजन, लीला तत्व, महत्व हृदयंगम होण्यासाठी वृंदावनातील सखीचा, मंजिरीचा अनुग्रह असावा लागतो. वन वृंदावनात प्रगट लीला मन वृंदावनात अप्रगट लीला आणि नित्य वृंदावनात अखंड लीला चालते. नित्य लीलेत मुख्य संयोग प्रगट मिलन आहे. तर गौण मिलन स्वप्नात चालते. मंद मंद वार्तालाप, जलक्रीडा, वृंदावन क्रीडा, यमुना जलकेली, नौका विहार, चीर हरण, वंशी चोरी, आंख मिचौली, मधुपान, चुंबन, आलिंगन, वस्त्राकर्षण, कपट निद्रा, स्पर्श दर्शन . लीला विलासाचे कल्लोळच्या कल्लोळ उठत असतात, येथे 'मी अधोक्षज नाचीन्नलो' अशी स्पष्ट कबुली परब्रह्म द्विभुज नराकृति शामसुन्दरने दिली आहे.


) रस माधुरी:
रूपाच्या लावण्ये, नेली चित्त वृत्ती, देखते भोवती, मी ते माझी.

येथे श्रीकृष्ण रस आहेत, श्रीराधा रती आहे. रतीचे तीन भेद आहेत:

) समर्था रती - प्रेम मधुवत, राग मंजिष्ठा आहे. नायिका प्रियकराला महासुख प्रदान करणेचे हेतूने नायकास मिळते - यात स्वसुख वासना नाही, फक्त प्रियकरास परम आनंद देण्याचीच इच्छा आहे. उदा. श्रीराधा
) समन्जसा रती - प्रेम घृतवत, राग कुसुमिका आहे. येथे प्रिया प्रियतम यांना समान सुख कामना आहे. उदा. रुख्मिणी, चंद्रावली, .
) साधारणी रती - प्रेम लक्षावत, राग शिरीषा आहे. यात केवळ स्वसुखेच्छा आहे. उदा. कुब्जा.     


) ऐश्वर्य माधुरी:
पुतना वध, यशोदेस विश्वरूप दर्शन, दावाग्नी प्राशन, गोपाल वस्त्रहरण, गोवर्धन उद्धार, ही सर्व ऐश्वर्य माधुरी आहे. भक्त हृदयात कृपाशक्तीद्वारा तीव्रातितीव्र शक्तिपाताने ही नारी (शक्ति) लीला प्रकाशित होते.


) काम प्रेम:
कामैर तात्पर्य निज संभोग केवळ कृष्ण सुख तो प्रबल.
लोक-धर्म, वेद-धर्म, देह-धर्म, कर्म, लज्जा, धैर्य, देह-सुख, आत्म-सुख, मर्म, सर्व त्याग करये.
करे कृष्णेर भजन, कृष्ण सुख हेतू, करे प्रेमेर सेवन, अतएव काम प्रेम बहुत अंतर, काम अन्ध्तर प्रेम निर्मल भास्कर (चैतन्य चरीतावली)


ब्रह्मानंद सेवानंद
ब्रह्मानंदे भवेदेव परार्ध गुणीकृत:
नैतिभक्ती सुखाम्भोधे: परमाणु तुलामपी 
(हरिभक्ती रसामृत सिंधु)

ब्रह्मानंदाला ब्रह्मानंदाने गुणले असता जी अंतिम संख्या येते त्यास परार्धाने ब्रह्मानंदाला गुणिले असता भक्तिसुख सिंधुच्या एका परमाणुची ही बरोबरी होत नाही.

प्रेमानंद सेवानंद
प्रेमानंदा पेक्षा सेवानंद सहस्त्र पटीने श्रेष्ठ आहे. श्रीकृष्ण सेवेत जेव्हा आनंदाचा अनुभव होत असतो अशा वेळी अश्रु कम्पादि सात्विक भाव उदित होतात श्रीकृष्ण सेवेत अडथळा आणतात. अशा वेळी परम पुरुषार्थ गोपी क्रोध करतात.
नीज प्रेमानंदे कृष्ण सेवानंद बाधे,
से आनंदेर प्रति भक्तेर है महाक्रोधे.


समर्पण योग
गोपीलीला हि पराकाष्ठेची समर्पण लीला आहे, नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता, तद्विस्मरणे परम व्याकुलतेती (नारद भक्ती सूत्र) यथा व्रजगोपिकानाम, असे म्हणून नारदांनी गोपींचा महिमा गायीला आहे. समर्पणाच्या या प्रेम भूमीवर स्थिर होण्यासाठी गोपींनी आपले सर्व जीवन कसे कृष्णनाम केले होते हे एकनाथ महाराजांनी ऊतम प्रकारे सांगितले आहे

यापरी मज वेगळ्या असता, मागे माझी कथावार्ता,
सदा माझे स्मरण करिता, मदाकारत्या पावल्या.

करिता दळण कांडण, माझे दीर्घ स्वरे गाती गुण,
की आदरल्या दधिमंथन, माझे चरित्र गायन त्या करिती.

करिता सडा संमार्जन, गोपीकासी माझे ध्यान,
माझेनी स्मरणे जाण, परिये देणे बालका.

गायाचे दोहन करिता, माझे स्मरणी आसक्तता,
एवं सर्व कर्मी वर्तता, माझ्या विसराची वार्ता विसरल्या.

करिता गमनागमन, अखंड माझ्या ठायी मन,
आसन भोजन प्राशन, करिता मध्यान तयासी.

ऐशी अनन्य ठायीच्या ठायी, गोपिकासि माझी प्रीती पाही,
त्या वर्तताहि देही गेही, माझ्या ठायी विनटल्या.

या परि बुद्धी मदाकार, म्हणोनी विसरल्या घरदार,
विसरल्या पुत्र भ्रतार, नीज व्यापार विसरल्या.

विसरल्या विषयसुख, विसरल्या द्वंद्व दु:,
विसरल्या तहान भूक, माझेनी एक निदिध्यासे.

जेणे देहे पतिपुत्राते, आप्त मानले होते,
ते चित्त रातले माते, त्या देहाते विसरोनि.

विसरल्या इहलोक परलोक, विसरल्या कार्य कारण नि:शेख,
विसरल्या नामरुप देख, माझे ध्यान सुख भोगिता.
(एकनाथी भागवत-१८५/१२)

प्रभू चरणावर प्रीती कशी करावी, चित्त भग्वदाकार कसे होते, याचे दिव्य दर्शन वरील ओव्यातून स्पष्ट होते.

'नित्य दास नित्य कांता भजनात्मकम वा' असा आपल्या भक्ती सूत्रातून मधुरा भक्तीचा गोडवा श्री नारदमुनी यांनी गायीला आहे.

कुरुक्षेत्रात श्रीकृष्ण पूर्ण-सत ज्ञानशक्ती प्रधान आहेत. द्वारका मथुरेत चित्त पुर्णतर क्रिया शक्ती प्रधान आहेत, वृंदावनात पुर्णतम, आनंद, इच्छाशक्ती प्रधान आहेत. कार्य विग्रह, शक्ती विग्रह, वस्तू विग्रह लीला विग्रह हे सर्व एकसमयावच्छेदे करून फक्त श्रीकृष्णातच आहेत, म्हणून त्याला पूर्णावतार म्हणतात. अवतार चार प्रकारचे असतात, ) उत्थानाधीन, ) कार्यार्थ, ) उपासनार्थ, ) भक्त्याधिकरण. कृष्णावतार हा भक्तांना प्रेमानंद देण्यासाठीच असलेला, भक्त्याधिकरण परास्त करणारी माधुर्य लीला आहे.
) वृन्दावनम परित्यज्य पादमेकं गच्छति
) पालिता गोप सुंदरी: कृष्णो क्वापिनो गता:

हे प्रेम सूत्र आहे. प्रेम, स्नेह, मान, प्रणय, राग, अनुराग, भाव, महाभाव, हि रस सामुग्री घेवून श्रीराधा माधवाची सेवा करते. श्री राधाभाव तो हाच.


वियोगात संयोग
जन दृष्टीने श्रीकृष्ण अक्रुराबरोबर मथुरेला गेले. येथे श्रीकृष्ण वियोग प्रत्यक्ष सुरु झाला. रसपुष्टीसाठी अंतरंगसखा श्रीउद्धवसखा हे संदेश घेऊन येतात. श्रीनंद, श्रीयशोद्य यशोदा, श्रीगोपिजन, श्रीराधा, यांना ब्रह्मज्ञान सांगून त्यांचा शोक हरण करणेसाठी सांत्वना देणे साठी श्रीउद्धव प्रवृत्त होतात. श्रीराधेला मनमोहनाचा संदेश श्रीउद्धव सांगू लागले. श्रीराधा हसू लागली, ती म्हणते, "शामसुंदर तर येथेच कदंब वृक्षाखालीच मंद मंद मुसकारा करीत आखमिचौनि करीत आहेत, मला एकांतात निकुंजवनात येण्यासाठी साद घालीत आहेत. मस्तकावर मोर मुकुट कानात कमनीय कुंडल झिलमील करीत आहेत. पहा, पहा, या मुरलीधराच्या मुरलीतून किती मंजुळ स्वर येतात." असे म्हणत म्हणत श्रीराधा प्रेम समुद्रात बुडून गेली, विवश झाली. श्रीराधेची ही श्रीकृष्ण विभोराता बघून श्रीउद्धव आनंदातीशयामुळे बेहोष होवून, ज्ञान विसरून श्रीराधा चरण स्पर्श प्राप्त व्रजधूलीत गडबडा लोळू लागले. गुरु बनण्यासाठी आले नि चेले होवून गेले. रसदृष्टी ही अशी आहे. बाह्य प्राकृत दृष्टीने येथे वियोग आहे, अंतरंग प्रेमदृष्टीने येथे वियोग आहे, दिव्य्याति दिव्य संयोग सुखाचे पुष्पबाण आहेत.


संयोगात वियोग
प्रियस्य संनीकर्षेsपी प्रेमोत्कर्ष स्वभावन्त:
या विश्लेषधियाssर्तिस्तत प्रेमवैचित्यमुच्यते

प्रेमाच्या उत्कट अवस्थेत प्रियतमाच्या अत्यंत समिप असूनही प्रभू जवळ नाहीत या निश्चयामुळे होणाऱ्या पीडेस प्रेमवैचित्य असे म्हणतात. श्रीमद भागवतात या लीलेचे अतीव सुंदर वर्णन केले आहे, शारदीय पौर्णिमेला महारास सुरु झाला. श्रीकृष्णचंद्र सर्व गोपिकांना सोडून एकट्या राधेस घेऊन एकांतात गेले. तेथे राधा मान करते. मला तुमचे खांद्यावरती चढवा असे म्हणते. श्रीराधेच्या या शब्दाबरोबर कोटीकोटी शशान्त सुशीतल श्रीकृष्णाचा हस्तस्पर्श खांद्यावर चढविण्यासाठी होताच ती प्रेमवैचित्य भावाप्रत गेली, तिची शुद्धी हरपली, ही स्थिती पहाताच श्रीकृष्णानी राधेचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले, मुखावर सुकोमल हस्तकमल फिरवू लागले, सावध करण्याचे नाना उपाय करू लागले. श्रीकृष्ण आपणाला सोडून निघून गेले असे वाटून श्रीराधेच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा सुरु झाल्या, ती पुकारू लागली.

हा नाथ, रमण, श्रेष्ठ, क्वासि महाभूज,
दास्याते कृपणाया मी सखे दर्शय सन्निधम.
(श्रीमद्भागवत १०-३०-४०)

हे नाथ, हे रमण, हे प्रियतम, हे महाबाहो तुम्ही कोठे आहात? मी तुमची दासी आहे. हे प्रियतमा, तुमच्या जाण्यामुळे मी दु: खी आहे. मजपाशी येवून त्वरित दर्शन द्या. राधेचे हे प्रेम श्रीकृष्ण आस्वादन करतात. वियोग तीरावर पूर्वराग, मान, प्रेमवैचित्य प्रवास असा आनंद रस वहातो तर मिलन तटावर संक्षिप्त (पूर्व रागाचे विराहानंतरचा), संकीर्ण (मान विरह वेदने नंतरचा) संपूर्ण (अल्पप्रवास जनित वियोगानंतरचा), समृद्धी (प्रदीर्घ विप्रलम्बनानंतरचा) असा उज्ज्वल प्रेमभाव उचंबळला.


कपट-निद्रा
श्री गोपिजनांचे मुरलीवर अपार प्रेम आहे, तसे वैर देखील. भाव ओळखून श्रीकृष्ण मधुलीला आरम्भतात. यमुनेच्या तटावर निकुंजात श्रीकृष्ण आले गोपींना मुरलीचे अपहरण करण्यासाठी अवसर मिळावा यासाठी निमित्त शोधू लागले. इतक्यात श्रीराधेची एक सखी फुले वेचीत नेमकी प्रभू ज्या ठिकाणी आहेत तेथेच येवून पोचली. चटकन शामसुंदर डोळे मिटून एका वेलीखाली रेलले, जणू श्रमाने निद्राच लागली. सखीने पहिले आणि ती त्याच पावली मागे येवून श्रीराधेच्या कानापाशी येवून कुजबुजली आणि वेणु चोरण्याचा कट शिजला, आपल्या पायातील पैंजण वाजू नयेत म्हणून रासेश्वरीने ते बांधले. सोन्याचे चुडे उतरले आणि मंद मंद पावलांनी चाहूल घेत मुरली चोरून नेली. माधवाची कपट निद्रा सफल झाली आणि या लिलेतुन नवी लीला अवतरण झाली. श्रीकृष्ण सखा मंडलात तसेच रासेश्वरी सखी जनात ही गुप्त बातमी पसरली. आता मुरलीच्या याचनेचे निमित्त करून श्रीराधेच्या मिलनासाठी अनुनय-विनयाची मधुर रसधारा प्रवाहित होईल. एकीतून दुसरी अशी नवनवोन्मेषशालीनी लीला भक्त सुखार्थ देव आरम्भ्तात. (मद्भ्क्तानाम विनोदार्थ करोमि विविध क्रिया: - पद्मपुराण) गोपिभावाविष्ट रसिकजन या श्रीकृष्णाच्या कपट निद्रेची उपासना करतात.

श्री गोपीगीत

चाळो जन मज म्हणोत शिंदळी |
परि हा वनमाली निसम्बे ||||
सांडोनी लौकिक झालिये उदास |
नाही भय आस जीवित्वाची ||||
नाइके वचन बोलता या लोकां |
म्हणे झाले तुका हरिरत ||||


हाची नेम आता फिरे माघारी |
बैसले शेजारी गोविंदाच्या ||||
घररिघि झाले पट्टराणी वळे |
वरिले सावळे परब्रह्म ||||
बळियाचा अंगसंग झाला आता |
नाही भय चिंता तुका म्हणे ||||

जय राधे, जय शामसुंदर, जय श्रीगोपिजन, जय वृंदावन, जय वृंदावन
गोपिजन वल्लभाय स्वाहा
श्रीराधार्पणमस्तु
श्रीकृष्णार्पणमस्तु.